Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

वासोटा ! निसर्गाचा कलाआविष्कार

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार , अाणि शिवछात्रपतींच्या स्वराज्य स्थापनेतील महत्वाचा निडर आणि निर्भीड शिलेदार म्हणजेच काळ्याभिन्न काताळातून निर्माण झालेला शिवसह्याद्री . आणि याच सह्याद्री च्या अंगाखांदयावर आज ही गार्वाने उभे असलेले शिवअलंकार म्हणजेच महाराष्ट्र भूमीला लाभलेले ३५० ते ४०० अभ्येद्य गडकोट किल्ले . आणि या पैकीच एक म्हणजे सातार जिल्ह्यातील जावळीच्या खोऱ्यात शिवसागर जलाशयाच्या पार्शवभूमीवर आज ही दिमाखात उभा असलेला आणि हिमालयातील शिखरांशी स्पर्धा करू पाहाणारा वशिष्ट डोंगर म्हणजेच किल्ले वासोटा ऊर्फ व्याघ्रगड .

समुद्र सपाटी पासुन ४२६७ फुट उंची लाभलेला हा दुर्गम दुर्गरत्न म्हणजे निसर्गाचा कलाआविष्कार च जणू , पौराणिक कथा नुसार वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. वसिष्ट चे पुढे वासोटा झाला असावा , अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. पुढे वासोट्याचे नाव शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. आसा हा दुर्गम व प्राचीन पण निसर्गाने मुक्त हास्ते उधळण केलेला किल्ले वासोटा .

गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत , एक वाट कोकणातील चोरवणे गावातून डोंगर धारेने थेट नागेश्वरापर्यंत पोहचते , आणि दुसरी वाट बामनोली वरून शिवसागर जलाशय पार करुण डोंगराच्या पायथ्या पासुन थेट किल्ल्या पर्यंत पोहचते. स्वाभाविक पणे आम्ही बामनोली चा मार्ग निवडला , आणि आमचा चमू मोठ्या उत्साहाने वासोटया च्या दिशेने रवाना झाला . सातारा सोडल्या नंतर अजिंक्यताऱ्याला स्पर्श करत थेट कास पठाराचा रस्ता धरला , कासपठार अर्थात पुष्प पठार चे नाव ऐकल्या बरोबर डोळ्या समोर उभे राहिले ते रंगीबेरंगी फुलांचे गलीचे , हिरवाकंच मनमोहून टाकणारा बेधुंद निसर्ग , धुक्यातुन वाट काढत धरती च्या कुशीत शिरू पाहाणारे पावसाचे अगणीत थेंब . हा निसर्गा चा बेधुंद खेळ डोळ्यासमोरुण पुढे सरकत असतानाच कोणी तरी ओरडले ; आरे हेच ते कास पठार ! आणि मी खिड़कीतून बाहर डोकावत अंधारात कास पठार शोधण्याचा प्रयत्न केला , आणि कास पठार माझ्या नजरेस पडले, पण पुष्प पठार मला सापडलेच नाही , मानेला झटका देऊन भानावर येत फेब्रुवारी महिना चालू आसल्याचे मनावर बिंबवले , आणि मणुष्य नावाच्या प्राण्यापासूण फुंलाच्या संरक्षणासाठी लावलेल्या कुंपनाकडे हताश मनाने पाहात खिड़कीतून डोक्याबरोबर मन ही आत घेतले, आणि वळणा वळणाचा रस्ता पार करात बामनोली च्या दिशेने झेपावलो .

आता मात्र मध्यरात्र उलटून गेली होती ; अन् गजबजलेल्या गावाचा आणि वर्दळीच्या रस्त्यांचा ताबा गडद अंधारानी घेतला होता . नियोजना प्रमाणे बामनोली च्या पश्चिम किणाऱ्यावर वसलेलेल्या पिंपरी गावचा नावाडी धरणाच्या वरच्या अंगला येऊन आमच्या सारख्या निशाचराच स्वागत करण्यास आतूर झाला होता . बामनोली गावातून पुढे गेल्या नंतर डोंगराला वळसा घेण्याच्या अगोदरच विजेरीचा प्रकाश झोत अंधाराला ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न करत आमच्या बाजूने पुढे येत होता . विजेरी च्या प्रकाशा जवळ काटक शरीराचे दोन तरुण आमचे स्वागत करुण गाड्या पार्क करण्याची व्यवस्था करण्यासाठी अंधारात चाचपडत होते , डोंगर उताराचा कच्चा रस्ता उतरून खाली गेल्यानंतर समोर अंधाराच्या कुशीत निपचित पहुडलेला कोयना जलाशय नजरेस पडला , आणि ज्याला महाराष्ट्रा ची जीवदायी म्हणून संबोधले जाते त्या जलशयाचे अंधाऱ्या रात्रीचे नीरव शांततेत दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला मिळाले . जलाशयाचे पाणी कमी झाल्यामुळे बोट खूप लांब आमची वाट पाहात पाण्यावर न डोलता अंधारात अंग चोरून उभी होती , गाडीतल्या सामानानी बोटितील जागा बळकावत पाण्याला झोपेतून जागे केले , हलकेशे पाय टाकत सर्वानी बोटीचा ताबा घेतला . इंजिन चालू होताच बोटीने गार वाऱ्यातुन आणि दाटलेल्या अंधारातून मार्ग काढत पाण्याच्या कमतरते मुळे निर्माण झालेल्या कृत्रिम बेटाला वळसा घालून ३० मिनिटाच्या प्रवासा नंतर आम्ही पैलतीराला म्हणजेच पिंपरी गावाच्या किणाऱ्याला लागलो . आता मात्र चंद्र उदय झाल्यामुळे जलाशय आपलसा वाटायला लागल होता लांब पर्यंत पाणी चमकत होते, बाजूच्या डोंगर रांगा चे अंधाऱ्या रात्रीचे सौंदर्य ही अगदी मनमोहक वाटत होते . कोडींबा नावाड्याने आम्हाला त्याच्या घराच्या ओसरीवर झोपण्याची सुचना केली मात्र आम्ही त्याचे धन्यवाद मानत जलाशयाच्या शेजारीच कृत्रिम कॉलनी ( टेंट ) उभी करुण मुक्कामाच बेत आखला , आणि गडद अंधाऱ्या रात्रीचे व शीतल चांदण्याचे रूप डोळ्यात साठवत अंधाराच्या कुशीत निद्राधीन झालो .

सकाळी जाग आली ती वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजातील भूपाळीने , जसे काही वेगवेगळ्या घरण्यातील दिग्गज गायकांची संगीत मैफिल भरली आहे आणि प्रत्येक जण आपआपली गायकी सादर करण्यासाठी अतूर झालेला आहे . मी पण फार दर्दी रसिक असल्याप्रमाने प्रत्येक अवजावरती वा क्या बात हैं ! अशी दाद देत होतो , खरच किती हा सुंदर निसर्ग , किती रंग , किती सुगंध , किती सूर , किती ताल . मनतल्या मनात खुश होत टेंट च्या बाहेर आलो , आणि पाहतो तर काय निसर्गाच् प्रचंड विलक्षण रूप डोळ्यात मावत नव्हतं , पूर्वेच्या डोंगराला पसरलेली लाली पाहून आसे वाटले की ; सुर्य देव कुठली तरी विजयी मिरवणूक घेऊन गुलाल उधळत आलेले आहेत . आणि समोरचा शिवसागर जलाशय खरोखरच शिव वाटत होता , त्याचे अथांग रूप डोळ्याच्या भिंगात बसणे अश्यकच . जलाशय नुकताच जागा झाला होता . धुक्याची चादर कुठे दूर होत होती अन् जलाशय आपले दुमडलेले पाय लांब करण्याच्या तयारीत वाटत होता . अन् मधेच कुठला तरी लांब चोचीच पक्षी येऊन हालकेशे त्याच्या गालावर टिचकी मारत होता . आजू बाजूचे अंधुक दिसणारे डोंगर ; माफ़ करा पर्वत आपली भव्यता सिद्ध करण्याच्या तयारीत दिसत होते , शेजारीच पोटात पाय घेऊन पडलेल्या होड्या पाण्यावर डोलत होत्या , मधुनच मासे डोंगराला वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न करत होते . आता मात्र अकाशातील लाली ची जागा निरनिराळ्या सोनेरी छटा नी घेतलेली दिसत होती , सूर्यदेव डोंगराच्या वर येऊन रथ पश्चिमेच्या दिशेने सोडण्याच्या तयारीत होते . पडलेल कोवळ ऊन आणि समोरचा अथांग निळाशार जलाशय बघुन पोहण्याचा मोह अवरणे कठीनच , कोंडीबा नावाड्याल पाण्याच्या अंदाजा विषयी विचारले, आणि भर दुष्काळात आन् पाणी टंचाईच्या काळात निळ्याशार पाण्यात ड्डबांयला मिळणे या सारखे परमभाग्य ते कुठले ? मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटुन आम्ही आता निघनार होतो ते किल्ले वासोटा कडे.
vasota trek camp

टेंट आणि बॅग ची आवराआवर करुण सर्व साहित्य बोटित टाकले , अणि बोट इंजिनाचा धूर धुक्यात मिसळत निळ्याशार रस्त्यावरून हलक्याशा लाटावर तरंगत वासोटया च्या दिशेने निघाली . आता मात्र बोटी प्रमाणे माझे ही मन लाटे वर तरंगायला लागले होते ; कधी एकदा समोरच्या डोंगराला वळसा घालतो आणि त्या प्राचीन दुर्गम दुर्ग रत्नाला डोळ्याच्या इंटरनल मेमरी मध्ये सेव्ह करुण ठेवतो आसे झाले होते . सकाळच्या अल्हाददायक वातावरनामध्ये बोट पाण्यावर डुलत चालली होती , बाजूच्या बेटावरील पर्णझडीच्या विळख्यात सापडलेल्या बोडक्या झाडावरुन मानेला झटका देत खंडया (धिवर पक्षी ) पाण्याच्या दिशेने सूर मारत सावजा वरती हल्ला करत होता , आणि मधूनच शेजारच्या पर्वत राजीतून निरनिराळ्या पक्षांचा किलबिलाट मनाला मोहिनी घालत होता . बोटीच्या बाजूला उठणाऱ्या लाटेमधे माशांच्या झुंडी जलक्रीडे बरोबरच अन्न शोधण्याच्या कामी लागल्या होत्या . आणि बोटी बरोबर पुढे सरकत होत्या , ही सर्व धडपड पाहात असताना स्वभाविकचपणे “ आनंद यात्रेचे आम्ही सह प्रवासी ” आशा आश्याच्या काही ओळी मनाला स्पर्श करुण गेल्या . माशांच्या अन्न शोध मोहिमेवरुण माझे ही लक्ष पोटोबा कडे गेले ; आणि कोंडीबा ने आणलेल्या पिवळ्या धमक पोहयावर ताव मारण्याची प्रचंड इच्छा निर्माण झाली . माशांना घास भरवत - भरवत मी माझी पेट पूजा उरकुन घेतली , आणि बॅगे मधील पाण्याच्या बॉटल चा शोध घेऊ लागलो , क्षणातच स्वताःच्या बुद्धिची किव करत समोर पडलेले ताट घेतले आणि बोटीतून खाली झुकत काचे सारखे लख्ख पाणी ताटात घेत मिटक्या मारत चांगले लीटर भर पाणी संपवले . प्रत्येक क्षणाला मी अधाशा सारखा आनंद लूटत होतो , आता मात्र बोटीने डोंगराला वळसा घालून सूर्याला पाठीवर घेतले होते . आणि मी मात्र वासोट्याला डोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत होतो .
अनेक छायाचित्रकारानी कोयना जलाशयातून वासोट्याची टिपलेली अनेक विहंगम छायाचित्रे ; आता पर्यंत मी फक्त डोळ्याच्या खोबनीत साठवत आलो होतो , पण हेच साठवलेले स्वप्न आज सत्यात उतरत होते , एखाद्या चित्रपटगृहा च्या मधल्या रांगेत बसून समोरच्या मोठ्या पडद्यावरचे नयनरम्य निसर्गचित्र बघावे आणि तोंडातून आपसुकच वहा.....व आसे शब्द बाहेर पडावेत , आणि टिकिटा साठी खर्च झालेले पैसे सार्थकी लागल्याची आभिमानस्पद भावना मनाला स्पर्श करुण जावी ; आणि नेमकी हीच अवस्था माझी झाली होती .जलाशयातून अकाशा च्या निळ्याशार विस्तृत पडदया वरती दिसणारा वासोटा अणि त्याच्याच उजवीकडे वशिंडा सारखा दिसणारा नागेश्वर सुळका, खाली पायथ्या पर्यंत दिसणारे हिरवेकंच विस्तृत जंगल , दोन्ही बाजूला अकाशासी स्पर्धा करू पाहणाऱ्या उंचच उंच डोंगर रांगा , आणि कोयना जलाशयाचे सपाट जागा दिसेल तिकडे वाट काढत अतिक्रमण केलेले निळेशार पाणी . वा किती सुंदर ! किती नयनरम्य ! मस्तच ! आशी अनेक दिलखुलास दाद देणारी वाक्य बोटीच्या प्रत्येक कोपरयातून येत होती . कुठे शोधीशी रामेश्वर । अन् कुठे शोधीशी काशी । च्या ऐवजी कुठे जाशी केरला। अन् कुठे जाशी काश्मीर । आशे काहीसे गुनगुनावे आसे मला वाटू लागले . बोट पुढे - पुढे सरकत होती , तसे धुक्याचे उरले - सुरले वलय ही शेवटच्या घटिका मोजत होते अन् वासोटा अधिकच विलोभनिय दिसत होता दिसत. सकाळच्या वातावरणामध्ये सर्व परिसर किती शांत वाटत होता , पण मधेच शेजारच्या जंगला मधून एखादी सुमधुर शिळ कानाला सुखद धक्का देऊन जात होती , पण कही क्षणातच प्रतिसाद म्हणून की काय ? पण त्याच्या पेक्षा सरस अशी शिळ कानाला तृप्त करत होती . आसे वाटत होते की बोटीचे इंजिन बंद करुण , फ़क्त या तानसेन रूपी पक्षांचे सुगम संगीत च ऐकत बसावे . बोटीला आता किनारा दिसू लागला होता , तसे आम्ही ही आता फ़ोटोग्राफी आणि दहा पंधरा वर्षानी तरुण होत “ नए जमाने के साथ चलो ” म्हणत सेल्फ़ी चा ही मनसोक्त आनंद लूटत होतो . खर तर नजरेत निसर्ग मावत नव्हता , वेडी समजूत म्हणून त्याला कॅमेऱ्यात बंद करण्याचा केविलवाना प्रयत्न करत होतो . बोटीने आता किनारा गाठला होता , बोट सुयोग्य ठिकाणी उभी करुण सर्व जण उतरण्याच्या तयारीत होते , तेव्हढयात माझी नजर शेजारच्या लाल माती कडे गेली , लाल मातीत किती सुंदर रंगोळ्या रेखाटलेल्या दिसत होत्या , क्षणभर आसे वाटले की ; आपल्या स्वगतासाठी तर या रांगोळ्या काढल्या नाहीत ना ? जलाशयाचे पाणी कमी झाल्यामुळे त्याच्या पाऊल खुणा लाल मातीत उठून दिसत होत्या . किती हां निसर्ग दयाळू आहे पहा ना ! “आपले अस्तित्व मिटत असताना सुध्दा पाठीमागच्या साठी आनंदाचा ठेवा निस्वार्थी पणे ठेऊन जाण्याची ही वृती ” . या निसर्ग रांगोळ्याना कमीत कमी इजा पोहचेल अशी सावध पावले टाकत बोटीपासुन दूर झालो , अन् शेजारच्या लाल टेकडीवर उभा राहत ; समोरच्या जंगलातून पूर्ण शारीर बाहेर काढून आकाशाला हात लावणयाच्या इराद्याने उभ्या असलेल्या वासोटया कडे बघुन खोल श्वास घेऊन एक मोठा उ:श्वास टाकला अन् नतमस्तक होऊन पावले उचलण्यास तयार झालो .
vasota001
धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे त्याच्या मालकी हक्काच्या जागेतूनच एक भला मोठा रस्ता तयार झाला होता , रस्ता नव्हे हा तर राजपथ च भासत होता , दोन्ही बाजूनी दगडाचे थर लाऊन ठराविक अंतरावर दुतर्फा उभे केलेले चौथरे स्वागताच्या कमनी सारखे भासत होते , राजपथावर चालत असताना एक प्रकारचा अभिमान जाणवत होता , अभिमानाने फुगलेलेल्या छातीवर उजव्या हाताची मुठ ठेऊनच झपा-झपा पावले ऊचलत , पाण्याच्या सहवासानी गुळगुळीत झालेल्या पण आपला कणखर पणा कायम ठेवणाऱ्या दगडातुन मार्ग काढत पाण्याविना गलितगात्र होऊन पडलेला ओढा ओलांडून वनविभागाच्या कार्यालयाजवळ पोहचलो . डोंगर दऱ्यातुन फिरणाऱ्या साह्यवेड्या भटक्यांनसाठी महाराष्ट्र सरकारच्या वनविभागने या ठिकाणी एक चेक पोस्ट उभे केलेले आहे , शिवसागर जलाशयाचे दक्षिण उत्तर पसरलेले पाणी आणि त्याच्याच पश्चिमेला असलेले किर्र आणि घनदाट जंगल , जंगलात वास्तव्याला असलेले विवध जंगली प्राणी , आणि सह्याद्री ची उंचच उंच शिखरे या मुळे हा परिसर अतिश्य दुर्गम विभागात गनला जातो , आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन कोल्हापुर वन विभागाने ही चौकी उभी केलेली दिसते . सरकारी सोपस्कर पार पाडत असताना ; पाठीमागच्या भिंतीवर लक्ष गेले , सर्व भिंती कशा नैसर्गिक वाटत होत्या . कोयना अभय अरण्या मध्ये कुठल्या प्रकारच्या वनस्पती आढळतात , त्याचे आयुर्वेदातील स्थान इ. महितीने भिंती खचाखच भरलेल्या होत्या , एका बाजूला जंगलात अढळणारे प्राणी आणि त्यांची सावजाच्या शोधातील आक्रमक छायाचित्रे पाहून काळजात जरा धस्.... च झाले . या जंगला मध्ये प्रमुख्याने रानगवा , आस्वल , बिबट्या , वाघ आणि जंगली कुत्री अढळत असल्याचा उल्लेख या ठिकाणी दिसत होता . त्याच प्रमाणे पिंगळा , घुबड, पाणकोंबडया इ. विविध पक्षी या ठिकाणी मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दिसले . त्याच बरोबर स्वतःचा संसार मोडून ; संपूर्ण महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना जलाशया मुळे विस्थापित झालेल्या ‘ मेट इंदवली ’ गावचे काही अवशेष ही या ठिकाणी पाहावयाला मिळातात .

वनखात्याने उभारलेल्या भल्या मोठ्या कमानी मधून जंगलात प्रवेश केला , तेव्हा रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पाट्या दिसत होत्या , काही पाटयावर जंगलातील वनस्पती बद्दल तर कही पाटयावर प्राण्यांन बद्दल पक्षांन बद्दल माहिती झळकताना दिसत होती , ही संपूर्ण माहिती वाचत पुढे जात असताना मना मध्ये सहज एक विचार आला ; की हा भाग जरी दुर्गम असला तरी नैसर्गिक सुविविधतेने संपन्न आहे , आणि ही नैसर्गिकता जपायची असेल तर ही दुर्गमता टिकून राहिलीच पाहिजे . आता मात्र विरळ जंगलाची जागा घनदाट जंगलाने घेण्यास सुरुवात केली होती . पानझडी चा हंगाम सुरु असताना सुध्दा या ठिकाणी त्याचा लवलेश सापडत नव्हता , कारण जंगल एव्हडे घनदाट होते की ; सूर्याची किरणे पानाच्या मधून जमिनीवर उतरने अशक्य . थोड्याशा पायपिटिनंतर एक छोटा ओढा ओलांडल्या नंतर दुसऱ्या मोठ्या ओढ्याच्या कडेला हानुमानाची मूर्ति (दिसण्याच्या आणि उभा राहण्याच्या साधर्म्य मुळे हनुमान म्हणन्याचे धाडस करतो आहे ) एका भग्न देवाल्यात विजयी मुद्रे मध्ये उभी असल्याचे दिसते . देवालायाच्या भिंती जरी खचल्या असतील तरी पण हानुमानजीच्या चेहऱ्यावर कुठे ही थकले पणाची जाणीव दिसत नाही , आशा या तेजस्वी मूर्ति समोर माथा टेकवून ; मागण मागण्याच्या मानवी स्वभावा नुसार बळ आणि धाडसाच् मागण मागितल आणि ठंड पाण्याचे दोन घोट घशा खाली रिचवत हनुमानजी नाराज नको म्हणून थोड़ा त्यांच्याशी हितगुज करत बसलो . पण जास्त वेळ बसन अशक्य म्हणून त्यांचा निरोप घेत व परत येण्याची हमी देत ; किर्र जंगलात लुप्त होण्यास निघालो .vasota03

आता मात्र दोन्ही बाजूने अकाशाशी स्पर्धा करू पाहाणारे खूप मोठ मोठे वृक्ष अन् त्या मधून जाणारी निमुळती वाट , अन् कुठून तरी सूर्याचे छोटेशे किरण मध्येच लूकलूक करत धरतीशी बिलगन्याचा प्रयत्न करत होते पण ते अशक्यच . कारण घनदाट जंगल आणि घनदाट या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावयाचा असेल तर या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या . या जंगलातील वृक्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ; या ठिकाणची झाडे वेडी वाकडी वाढलेली दिसत नाहीत . या ठिकाणचा प्रत्येक वृक्ष हा अशोकाच्या झाडा प्रमाणे सरळ वर गेलेला दिसत होता , मनात म्हटले नाही ! या झाडांची रचना च तशी असेल , पण माझे कुतुहल कही कमी होत नव्हते , आणि झाड ही वाकडे दिसत नव्हते . मी आता पर्यंत रामकाट ( गोड्या बाबळीचा एक प्रकार ) , अशोक , बांबू , माड , नारळ आशा प्रकारची झाडे सरळ पाहिली होती , पण या ठिकाणी अंबा , वड , पिंपळ , जांभूळ आदि वृक्ष अकाशा कडे धाव घेताना दिसत होते . या प्रकाराचा अर्थ मला काही केल्या उमगेना ; म्हणून मी मित्राला विचारले , आरे हा काय प्रकार आहे ! त्याने माझ्या चेहऱ्या कडे पाहात तिरपा कटाक्ष टाकतस्मित हास्य केले , आणि पुढे चालू लागला . मी मात्र पुन्हा बैचेन .पुन्हा माझा तोच प्रश्न . आता मात्र त्याने माझ्या बुद्धि ची किव करत, विझाना तील प्रकाशसंश्लेषणा चा सिद्धांत माझ्या डोक्यात घुसवण्याचा प्रयत्न केला . डोळ्याला तान देत मानेला झटका देत स्वता:च्या बुद्धिची किव करत मधल्या डोंगराच्या चढनीला लागलो , आणि मनात म्हटले आच्छा तर ही झाडे सूर्यप्रकाशाच्या शोधात वर निघाली आहेत तर ! रसत्याच्या बाजूला उन्मळून पडलेले भले मोठे वृक्ष ही दिसत होते , काही ठिकाणी तर रस्ता बंद करुण आडवे पहुडले होते , या मधून वाट काढत पुढे सरकावे लागत होते . बाजूला वेलीच्या काही घनदाट जाळया ही दिसत होत्या , आणि त्या मध्ये लुप्त झालेले काही बांधकामाचे आवेशष ही नजरेस पडत होते . असा हा अनुपम नजराण डोळ्यात साठवत पुढे सरकत होतो . आता माञ उन्हाचे कवडसे ही जमिनीवर उतरताना दिसत नव्हते , जंगला मध्ये भर दिवसा काळोख जाणवत होता , आणि अजुबाजूला पानांचा आणि लाकडा चा खच दिसत होता , इथल्या वेलीचे ही वृक्षा मध्येच रूंपातर झालेले जाणवत होते , आजुबाजूला १० ते १५ फुटाच्या पुढे काही दिसत नव्हते ; ना वर आकाश ही . वासोटा तर कुठे लुप्त झाला होता तेच कळत नव्हते , पण जमेची बाजू म्हणजे कुठेही न वळणारी वाट आणि वाटेत लावलेले मार्गर्दशक फलक इतकेच ते काय . उन्हाचा आणि आमचा आता संबधच संपलाच होता ; पण अंगातून घामाच्या धारा सतत वाहात होत्या . चढण अगदी अंगावर होती त्यामुळे श्वास प्रचंड प्रमाणात वाढला होता , पाय जड झाले होते , घशाला कोरड पडत होती , पण निसर्गा च्या अंतरंगात मिसळून जाण्यात वेगळीच मजा जाणवत होती . झाडे , पाने , फुले , रान फळे , पक्षी , प्राणी , डोंगर , दऱ्या , उंच उंच सुळके , घनदाट जंगल आणि त्याच्या जोडीला निळेशार पाणी हे सर्व देतांना निसर्गाने कुठेही न केलेली कंजुषी हे तर वासोटया चे वैशिष्टय आहे . किती भरभरुन दिले आहे निसर्गाने . हे सर्व विचार मनामध्ये येत असतानाच ; मोठ मोठे श्वास घेत डोंगराची भली मोठी चढण पूर्ण करुण उजवीकडे वळण घेताच सामोर पुन्हा एक भला मोठा मार्गदर्शक फलक दिसला , “ नागेश्वर ३ कि.मी. ” . वासोट्या च्या जंगलातील शेवटच्या टाप्याची चढण पूर्ण करत असताना उजवीकडे एक रस्ता उतरणीच्या बाजूने जातो तो सरळ नागेश्वर सुळक्यावर जातो . किल्ल्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूच्या मार्गाने सरळ चढणीला लगावे , आणि तोच मार्ग पकडून शेवटच्या टप्यावरील चढाईला सुरवात केली . सरळ चढणी नंतर डाव्या बाजूचे वळण घेतले आणि एका उघड्या पठारावर पोहचलो , येथे मोठमोठी झाडे नसली तरी कारवीची भरपूर प्रमाणात वाळलेली झुडपे दिसत होती . हा मध्येच उघडा पडलेला भाग पाहून मनातल्या मनात हासत म्हटले ; डोंगराला ही टक्कल पडले की काय ? कंबरेवर हात देऊन मागे वळून बघतो तर काय ! संपूर्ण डोंगर हिरवा रंग दिल्याप्रमाणे दिसत होता , आणि खालच्या बाजूला शिवसागर चे निळे पाणी डोळ्याला तृप्त करत होते. कॅनव्हास वर एखाद्या अनुभवी चित्रकारने त्याच्या संपूर्ण अविष्यात कमावलेला सर्व अनुभव खर्ची घालून चित्र रेखाटावे , आसेच हे चित्र होते . समोर वळून पाहिले तेव्हा ‛ मनात चर्र असा अवाज आला आणि काळीज करपल्याचा वास आला ’ कारण ज्या प्रमाणे महारष्ट्रातील सर्वच किल्ल्यावर जी थोड्या बहूत प्रमाणात अवस्था दिसते तीच अवस्था या ही ठिकाणी दिसत होती . किल्ल्याच्या अर्ध्या अधिक पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत दिसत होत्या आणि तट बंदी तर शेवटच्या घटका मोजत असल्याचे जाणवले . आणि पुन्हा एकदा अशाळभूत नजर मुंबईत बसलेल्या सरकार नावाच्या व्यवस्थेकडे गेली ; आणि छत्रपतिच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पयरीची धूळ मस्तकी लावत ; जय भवानी ! जय शिवाजी ! ची गगनभेदी गर्जना देत वासोटया वर पाऊल टाकले .
vasota02
वासोटया वर पोहचता क्षणी समोरच डाव्या बाजूला दृष्टिस् पडते ते चिरेबंदी दगडात बांधलेले हानुमानजीचे मंदिर , मंदिराची अवस्था पण फार चांगल्या स्थितीत नाही , तरी पण मंदिर मात्र अप्रतिम आहे. मंदिराला छत नसले तरी छताची जागा वृक्षा च्या सावली ने भरूण काढली आहे , मंदीरा समोरील ओटा प्रशस्त असून बांधकाम ही सुस्थितित आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला बांधकामासाठी लागणारा चुना मळण्या साठी लागणारे दगडाचे भले मोठे चाक आजुन ही चुना मळण्याच्या तयारीत उभे आहे . त्याच्या थोडे पुढे गेल्या नंतर दृष्टीस पडते ते स्वच्छ आणि लख्ख पाण्याचे भले मोठे टाके. शिवकालीन पवित्रता लाभलेल्या या टाक्यातून पाण्याची एक बॉटल भरून घेतली ; आणि दोन घोट घशाखाली रिचवत झाडातुन थोड़ा पुढे गेलो , तर समोर हिरव्यागार वृक्ष वेलिनी नटलेल्या आणि बहरलेल्या जुन्या वासोटयाचे दर्शन होते , अजुन थोडे पुढे गेल्यास छातीत धडकी भरवणारा अजस्त्र महाकाय बाबूकडा दृष्टीस पडतो , (याचे नाव बाबू कडा का पडले ? त्याचा मात्र मला शोध नाही लगला ) जुन्या वासोटया च्या टोकापासुन ते खालच्या दरीपर्यंत सरळ तासीव आकारात असलेला हा कडा म्हणजे वासोट्याच्या प्रचंड कणखरतेचे विराट स्वरुप दर्शवितो , बाबू कड्याचे अजून एक वैशिष्टय म्हणजे कड्याला मध्ये मध्ये दिसणारे खडकांचे वेगवेगळे थर , आणि हे थर ही मनाला अलगद पणे मोहिनी घालून जातात . बाबू कड्याच्या समोरच वासोटयावरुण निघालेली एक डोंगररांग आणि त्याच्यावर दिसणारे सुळके ही निसर्गाच्या अप्रतिम कलाकुसरीमधे मध्ये भाव खाऊन जातात . आणि दोन्हीच्या मध्ये दिसनारी दरी सुद्धा काळजाचा ठेका चुकवल्या शिवाय राहत नाही . दरीच्या समोर छोट्या मोठ्या डोंगरानी वेढलेला कोकण भूमिचा निसर्गमय भूप्रदेश आणि पाठीमागे शिवसागर जलाशयाचे नयनरम्य मनमोहक रूप , अणि वासोट्याच्या रांगेत उभी असलेली उंच - उंच शिखरे मनाला वेड लावल्या शिवाय राहत नाहीत . सह्याद्रीचे मनमोहक रूप डोळ्यात साठवत , किल्ल्याच फेरफटका मारत किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेल्या महादेवाच्या मंदिरा समोर आलो , डोळ्याच पारण फेडनार हे शिल्प आणि त्यावर दिमाखात फडफडनारे स्वराज्याचे भगवे निशान पाहून छाती गर्वाणी फुगली अन् तोंडातून आपसुकच हर हर महादेव ! ची गर्जना बाहेर पडली . आणि पुन्हा एकदा शिवछत्रपतीच्या स्वराज्य उभारणीचा पट डोळ्यासमोरुण सरकू लागला . स्वराज्याच्या विरुध्द बंड करणारे जावळीचे मोरे छत्रपतींच्या अक्रमना पुढे झुकले आणि त्याच वेळेस राजांनी जावळी सह आसपास चा परिसर व किल्ले स्वराज्यात सामील करुण घेतले पण वासोटा थोडा दूर असल्यामुळे तो महाराजांच्या हाती आला नही , पण माहाराजांच्या नजरेतून तो सुटला नाही . पुढे शिवाजीमहाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.अफझलखाच्या वधानंतर शिवाजीच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला. त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा --श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा ; तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.
vasota04

vasota06
सुंदरते बरोबरच या किल्ल्याला मोठा इतिहास ही लाभला आहे . शिवशंभो ला नमन करत ; थोडा पुढे गेलो तर पुन्हा एकदा डोळे दीपवनारे सह्याद्रीचे अथांग रूप नजरेसमोर येत होते , डाव्या बाजूला दिसणारी वसोट्याची महाकाय भिंत आणि त्याच्याच पुढे खोल दरीच्या वर दिसणारा एक सुळका आणि त्याचाच पुढे दिसणारे नागेश्वराचे मनोहरी रूप . आणि उजव्या बाजूला पसरलेले सूर्यप्रकाशाला ही वाट शोधायला लावणारे जंगल . थोड़े पुढे जात स्वराज्याच्या ध्वजस्तंभाला मुजरा करत , नागेश्वराच्या दिशेने जाणाऱ्या वळवणावळणाच्या नागमोडी वाटेला ह्रदयाच्या कप्यात साठवत , नागोश्वराच्या चरणी नतमस्तक होत ; स्वराज्याच्या या देखण्या अंलकाराला मानाचा मुजरा करुण , एक देखना निसर्ग अत्तराच्य कुप्पीप्रमाणे डोळ्यासह ह्रदायाच्या कप्यात आंनत काळासाठी निसर्गमय ठेवा जपून ठेवण्याचा निर्धार करुण ; मावळतीला कललेल्या सूर्याला पाठीवर घेत , पुन्हा अशाच एखाद्या निसर्ग शिल्पाला बिलगण्याचा बेत आखत , जड पावलानी वासोट्याच्या निरोप घेत पायऱ्या उतरून जंगलामध्ये लुप्त झालो .

शिवाजी आंधळे
भ्रमनध्वनी : ९८५०५५५९५२
shivaandhale.75@gmail.com

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Apr 04, 2016