Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

लिंगाणा एक थरार

राकट , रांगडा , अभेद्य , अजस्त्र , कणखर , बळकट अशी अनेक बिरुदे भाळी घेऊन मिरवणारा . नव्हे - नव्हे अशा अनेक उपाधीनी ज्याच्या पायाशी लोळण घ्यावी. अन्  पाहता क्षणी  हृदयाचा ठेका चुकावा असा  सुळका , घाट माथा आणि कोकण यांच्या सीमेवर आणि  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडा च्या पूर्वेला युगेन् युगे दिमाखात उभा असलेला किल्ले “ लिंगाणा ”.

लिंगा सारखा आकार असल्यामुळे याला लिंगाणा म्हटले जाते . २९६९ उंचीचा हा बेलाग दुर्ग स्वराज्याचा अर्थात रायगडाचा पहारेकरी म्हणून ओळखला जातो . स्वराज्या मध्ये या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर केला जात होता अशी इतिहासात नोंद सापडते . म्हणून तर रायगडाला राजगृह आणि लिंगण्याला कारागृह म्हटले जाते . याच्या भव्यतेविषयी आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुळक्याविषयी खूप वेळा ऐकले होते . पण ऐकणे आणि प्रत्यक्षात अनुभवणे या मध्ये कितीतरी मैलाचे अंतर असते याची प्रचिती याची देही याची डोळा अनुभवली ती ८ एप्रिल २०१७ च्या चांदण्या रात्री .

दुपारचे चार वाजले होते , सूर्य आग ओकत होता . उकाड्याने अंगाची लाही-लाही होत होती . जीव कासावीस झाला होता . तरी पण “ शिखर फाऊंडेशन ” टीम च्या उत्साहा मध्ये कुठेही कमी जाणवत नव्हती . कारण ही तसेच होते . शिखरच्याच गिर्यायोहकांचेच  नव्हे तर ;  सह्याद्रीत भटकणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकांचे हे स्वप्न असते , एकदा तरी ह्या स्वप्नातल्या कातळ कड्याला भिडण्याचे . आणि का नसावे ? . म्हणून तर महत प्रयासाने आखली होती मोहीम “ किल्ले लिंगाणा ”. आणि आज तो दिवस उजाडला होता मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी म्हणजेच दिनांक ८ एप्रिल २०१७ . शनिवार रविवार च्या सुट्टीचा मेळ घालत “ टीम शिखर ” अंगाची लाही करणाऱ्या चैत्राच्या उन्हातच झेपावली ती लिंगोबाच्या दिशेने . नेहमी प्रमाणे गणरायाचा आणि अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवरायांचा जयघोष करत टीम ने चिंचवड सोडले .

आज मात्र गाडीतील चेहरे काहीशे अनोळखी वाटत होते . लिंगोबाच्या मोहिमेसाठी सांगली , सातारा , कोल्हापूर , मुबंई अशी वेगवेगळ्या परगण्यातील मंडळी सामील झाली होती . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता , उत्साह होता . प्रत्येकाला वेध लागले होते ते आभाळी गेलेल्या लिंगोबाचे . जीव गुदमरून टाकणाऱ्या गर्दीतून बाहेर पडत आम्ही सरळ खडकवासला धरण  गाठले . वातावरणात आल्हाददायकता जाणवत होती . पाण्याने तुडुंब भरलेला जलाशय सोनेरी उन्हाच्या किरणाने व्यापला होता . मध्येच येणाऱ्या लाटा किरणांचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत होत्या , परंतू पदरी निराशा बाळगत मागे हटत होत्या . निसर्गाच्या खेळाचा आनंद लुटत सिंहगडाच्या दिशेने रवाना झालो . सिंहगड म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो ४ फेब्रुवारी १६७० चा नरवीर तान्हाजी मालुसरेंचा रणसंग्राम . आणि तो दिव्य पराक्रम . सरकन डोळ्यासमोरून लढाईची पाने पलटू लागली तसा तान्हाजी कडा दृष्टीस पडताच ; येथे कर आमुचे जुळती ! या उक्ती प्रमाणे माझे दोन्ही कर आपोआप या जिगरबाज मावळ्यासमोर जुळले .  नारवीरांचे स्मरण करत मनाने पुन्हा गाडीतील जागा व्यापली . पाबे घाटातील अवघड वाटणारी दोन वळणे लिलाया पार करत आमचा यांत्रिक रथ निष्णात सारथ्या च्या मदतीने पाबे खिंडीत पोहचला . पाबे खिंडीत पोहचताच अंगावर रोमांच उभे राहतात . कारण समोर दिसतो तो ; छत्रपतींच्या राजकीय महत्त्वकांक्षेची उंची दाखवणारा दुर्गमहर्षी किल्ले राजगड . आणि एका बाजूला स्वराज्यचे तोरण बांधलेला तोरणा . संधी प्रकाशात किती विलोभनीय वाटत होती  स्वराज्याची ही रत्न . सूर्य क्षितीजाच्या पल्याड कधीच गेला होता . मात्र आकाशात लालीच्या रूपाने पाऊलखुणा सोडून . काही क्षणातच अंधाराची चाहूल लागणार म्हणून जरा घाईनेच पाबे खिंड उतरून वेल्हा गाठले . वेल्हा गावातून पुढे जात , गुंजवणी जलाशयाची संगत करत मढे घाटाचा रस्ता धरला. चैत्र शुद्ध त्रयोदशी चा दिवस असल्यामुळे कलेकलेने वाढत जाणार चंद्र सह्याद्रीच्या शिखरांवरती प्रकाशाची उधळण करू पाहत होता . जसा - जसा पुढे जात होतो ; तसा चंद्र प्रकाशा ने सह्याद्रीचा आसमंत उजळून निघालेला दिसत होता . शितल चांदण्यात गुंजवणीचा परिसर शांत पहुडला होता . तोरणा गडाला वळसा घालून मढे घाटला जाणारी वाट सोडली आणि सिंगापूर ला जाणाऱ्या उजवीकडच्या  वाटेला जेव्हा वळलो , तेव्हा मात्र वेध लागले होते लिंगण्याचे . ड्रायव्हर ची कसोटी पाहणारा पाच ते सात किलोमीटरचा रस्ता पार करत असतानाच प्रथम दर्शन झाले ते चंद्राला स्पर्श करू पाहणाऱ्या लिंगोबाचे . गाडी वळणे घेत होती तसे लिंगाणा हि कधी उजवीकडून तर कधी डावीकडून दर्शन देत होता . लिंगण्याचा वर जाणारा सुळका परिसरातील सर्वात उंच सुळका दिसत होता . सुळका दृष्टीस पडताच काहींच्या पोटात भीतीचा गोळा आला होता . तर काहींच्या मनात आनंदाचे भरते आले होते . अशा समिश्र वातावरणातच  आम्ही नऊ वाजता मोहरी गावात पोहचलो . मोहरी गाव अगदी छोटस . शांत आणि निवांत अंग चोरून बसलेलं . झाडाच्या आड लपलेली दहा - वीस घर हेच काय त्याच गाव पण . गाडी लावली तरी गावाचा काय मागमूस लागत नव्हता .  पुढे होऊन पहिले तर तीन चार घर दृष्टीस पडली अन् विश्वास बसला ; हेच ते मोहरी गाव.  संपूर्ण परिसर चंद्राच्या प्रकाशाने अगदी न्हाऊन निघाला होता . लुकलुणाऱ्या कोटी कोटी तारका पुंजाच्या प्रकाशाने परिसराला सोनेरी झळाळी प्राप्त झाली होती . अशा या वातावरणात रममाण होत , मूनलाईट डिनर आटोपले . आता या ठिकाणाहून लवकरात लवकर लिंगण्याकडे रवाना होणे क्रमप्राप्त: होते , कारण काल रात्री रोप फिक्सिंग साठी लिंगण्याकडे रवाना झालेली “ शिखर क्लाईंम्बिंग टीम ” आमची वाट पाहत होती . त्यामुळे वेळ न दवडता सर्वांची विभागणी तीन गटात केली . हार्नेस , स्लिंग , हेल्मेट अशा सुरक्षयुक्त साधनांनी सज्ज तिन्ही टीम मोहरी सोडून लिंगण्याचा दिशेने झेपावल्या .

पठारावरून थेट जंगलात घुसणारी वाट पकडून ४५ मिनिटात आम्ही दगड गोट्यानी भरलेल्या बोराट्याच्या नाळेजवळ पोहचलो . नाळेच्या बाजूच्या दोन्ही कातळ भिंती चांदण्याच्या लख्ख प्रकाशात अगदी गडद पणे दिसत होत्या . पठारावरून सरळ कोकणात उतरणारी हि नाळ जितकी सुंदर तितकी भयावह देखील . पाहता क्षणी पावले थबकावी अशीच . नाळेतून दिसणाऱ्या दापोली गावच्या लाईट्स म्हणजे नाभीचे तारे अंगणी च जणू ! . दूरवर दिसणारा कोकणचा प्रदेश , किती अद् भूत दृष्य हे ? प्रेमात पडावे असेच . पठारावरून रस्ता थेट नाळेत उतरतो . छोटे - मोठे दगड पार करत सर्वजण एका भल्यामोठ्या दगडा जवळ येऊन थबकले . या भल्यामोठ्या दगडाने नाळेचा रस्ता अडवून धरला होता . म्हणून या दगडालाच रोप लावून उतरण्याची सोय केली होती . एक-एक मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होता . तोच जोराचा आवाज झाला ! आणि सर्वजण आहे त्याच जागी थबकले . पुढे होऊन पाहतो तो काय एक दगड निसटून थेट प्रवीण च्या हातावर आला होता . तो खाली जाऊन भास्करच्या पायावर पडणार तोच प्रवीण ने स्वतःच्या हाताने त्याला थांबवून भास्करचा पाय बाजूला घेईपर्यंत रोकून ठेवले . हाताचा आधार काढून घेताच दगड थेट नाळेतून आवाज करत कोकणच्या दिशेने गडगड करत खाली गेला,  पण प्रवीण च्या बोटांना इजा करूनच . अशा या बोराट्याच्या नाळेच्या मध्यातून रस्ता उजवीकडे वळतो . नाळेपेक्षा थरार याच ठिकाणी अनुभवायला मिळतो . खाली खोल दरी ; आणि पाय ठेवण्यास पण तुटपुंजी जागा. अशा स्थितीत तुम्हाला स्वतःला रोप मध्ये अडकवून घेणेच सोईस्कर ठरते . एक मोठे वळण घेतल्यानंतर समोरच एक आकाशाला गवसणी घालणारा काळाभिन्न डोंगर काळजाचा ठेका चुकवतो , तोच हा अजस्त्र , अभेद्य , राकट , रांगडा “ लिंगाणा ” .  शेवटी कस पाहणारी बोराट्याची नाळ आणि कड्यावरचा निसरडा रस्ता पार करून आम्ही एकदाचे लिंगण्याचा पायथ्याला पोहचलो .

रायलिंगचा डोंगर आणि लिंगाणाच्या मधल्या घळीतूनच लिंगाण्याची चढाई चालू होते . जेमतेम २५  लोक थांबू शकतील एव्हडीच जागा . त्याच ठिकाणी आमच्या टीम ने बेस कँम्प लावला होता . एक दिवस अगोदरच या ठिकाणी दाखल झालेली “ शिखर ” ची क्लाईंम्बिंग टीम आमच्या दिमतीला सज्ज होती . क्लाईंम्बिंग टीम ने संपूर्ण रात्र आणि पूर्ण दिवस ४२ डिं. तापमानात राबून आमच्या साठी लिंगण्यावर सुरक्षा दोर लावून ठेवला होता . या मध्ये जालिंदर वाघोले यांनी टीम च्या मदतीने संपूर्ण लिंगाणा क्लाईंब केला होता .

हर हर महादेव ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! शिवगर्जनेच्या थाटात संजय ने चढाईची आघाडी घेतली . टिपूर चांदण्यात लिंगण्यावर मोहीम फत्ते च्या इशाऱ्यात चढाई चालू झाली . आणि पाहता पाहता प्रत्येक जण सज्ज होऊन दोराच्या दिशेने झेपावत होता . लिंगण्याला वंदन करून कूच करत होता . संजय तान्हाजी मालुसरेंच्या थाटात सर्वांना वरच्या बाजूने सूचना करत होता . आणि ३५ मावळे दोराला बिलगले होते . दोराच्या साह्याने काळ्याभिन्न कताळाशी झुंज चालू होती . कधी टॉर्च तर कधी स्वतःला सावरत चढाई चालू होती . काही ठिकाणी निसरड्या मातीतून ;  तर काही ठिकाणी ढिसाळ खडकातून चढाई चालू होती . आधार तो फक्त चांद्रप्रकाशाचा आणि सुरक्षा दोराचा . तरबेज होते ते लिलाया चढाई करत होते . नवखे मात्र अडखळतच साह्यकड्याशी संघर्ष करत होते . १२:४५ ला सुरु केलेली चढाई दीड तासाच्या झुंजी नंतर २:१५ वा. लिंगण्याचा गुहेजवळ थांबली . दीड तासाच्या अथक परिश्रमाला यश आले हॊते एक-एक करून सर्व मावळे वर येत होते . पहिला सात गिर्यारोहकांचे जथ्था वर आला आणि पुन्हा एकदा शिवगर्जने सह्याद्रीची कूस बदलण्याचा प्रयत्न केला .

रायलिंग पठारावरून काही हौशी छायाचित्रकार अंधारतले हे अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्या मध्ये टिपत होते . पाठरावरती फ्लॅश चा लखलखाट चालू होता . तशा बोराट्याच्या नाळेकडून काही टॉर्च पुढे सरकताना दिसत होत्या . नंतर लक्षात आले हि तर आपलीच मागे राहिलेली करवीरवासी पाटलांच्या बरोबर आलेली आय बी एन लोकमत ची टीम आहे . इकडे मात्र काजव्यांची रांग पुढे सरकत गुहे जवळ येण्याचा प्रयत्न करत होती . मी मात्र वेळेचा सद्उपयोग करत गुहे जवळच मातीत थोडी ताणून देण्याचा प्रयत्न केला . पाठ जमिनीला लावली पण , डोळ्याला डोळा लागत नव्हता . आकाशा मध्ये असंख्य तारकापुंजांची गर्दी झाली होती . चंद्राचा प्रवास पश्चिमदिशेने चालू होता . काही गडद तर काही फिकट तारकांच्या आकृत्या जुळवण्यात मी दंग होतो . तशी टीम वर - वर सरकत होती . त्याच गतीने रात्र पण पुढे सरकत होती . रात्रीचे तीन वाजले होते . विक्रांत ने आणलेल्या बेसिलच्या थंड चहाचे तीन चार घोट “ वा क्या बात हैं ” ! अशी विशेष दाद देत मटकावले . आणि पुढच्या चढाईसाठी टीमच्या बरोबरीने सज्ज झालो .

डोळ्यावर झोप अधिराज्य करू पाहत होती . पण झोपेवर थरारत कधीच वरचढ ठरला होता . अशातच पुढच्या टप्याचा थरार अनुभवण्यास सज्ज झालो . आणि पुन्हा एकदा अंधारात चाचपडतच पाण्याच्या टाक्याच्या बाजूने चढाईला सुरुवात केली . अंगात वीरश्री संचारल्या सारखे आम्ही चढाई करत होतो . कधी रोपचा अधार घेत तर कधी दगडाच्या कपारीमध्ये हात घालून मुंगीच्या पावलाने वर सरकत होतो . चंद्र पश्चिमेला झुकल्यामुळे खाली संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले होते . वाट दिसत नव्हती , पण एकमेव वाटाड्या म्हणून रोपचा आधार होता . काही ठिकाणी कपारीवरची पकड सुटून हात सोलटून निघत होते . पण हार ना मनात ना अंधाराची मुलहिजा ठेवता चढाई सुरु होती . दोन टप्पे वर चढून गेल्या नंतर माथा दृष्टीस पडू लागला . पण पुढे सरकू तसे आणखी एक माथा नजरेस पडत होता . अन् खऱ्या अर्थाने चंद्रप्रकाशात मृगजळाचा खेळ चालू झाला . रातीचे पाच वाजून गेले होते . संपूर्ण सह्याद्री पहाटेच्या अंधारात निपचित पहूडला होता . पण लिंगोबाचा डोंगरावर मात्र “ शिखर ” च्या ठाकर गड्यांची चढाई चालू होती . भर काळोखात टॉर्च च्या साह्याने अंतीम टप्प्याकडे टीम झेपावली . सह्याद्रीतील मॅटर हॉर्न समजला जाणारा लिंगाणा काही मिनिटातच सर होणार हे आता निश्चित झाले होते . अंगातले त्राण संपले होते . पण लक्ष्य टप्यात आल्यामुळे अंगात दहा हत्तीचे बळ संचारले होते . अंगावर ठिकठिकाणी खरचटलेल्या जखमांचा दाहा होत होता . पण अंगावर अनेक वार होऊन सुद्धा ; योद्धा ज्या त्वेषाने लढतो , तोच त्वेष आणि तीच जिगर घेऊन “ टीम शिखर ” च्या पहिल्या सात  गिर्यारोहकांची एक तुकडी पहाटेच्या संधिप्रकाशात तीन हजार फूट उंचीच्या , सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या साह्यसुळक्यावर अर्थात “ लिंगाणा ” किल्ल्यावर पोहचली . आणि भान विसरून पहाटेच्या निरव शांततेला अव्हान देत ; दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा परिसर जय भवानी ! जय शिवाजी ! हर हर महादेव ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा रणभेदी शिवगर्जनेनी दणाणून सोडला . रात्रभर चालू असलेला थरार दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या संगतीने अनेक साह्यसूळक्यांनी याची देही याची डोळा अनुभवला . अन् लिंगोबा हि चंदेरी चढाईच्या थराराने रोमांचीत झाला .

पाड्यावरील कोंबड्याच्या बांगेने सह्याद्री जागा झाला होता . पूर्वेला लाली पसरली होती . तशा सूर्यकिरणांच्या अनेक रंगी बेरंगी छटांनी सहयाद्री उजळून निघत होता . पूर्वेला पहिले किरण पडले होते ते किल्ले राजगडावर . छत्रपतींच्या स्वराज्य विस्ताराची महत्वकांक्षा ज्यांनी जवळून पहिली तोच हा किल्ले राजगड . किल्ले राजगडाचा बालेकिल्ला नजरेच्या टप्यामध्ये येत होता . त्याच्या अलीकडे स्वराज्याचे तोरण ज्याच्या भाळी मोठ्या दिमाखाने मिरवले गेले तो किल्ले “ तोरण गड ” . समोर पोटात धडकी भरवणारी बोराट्याची नाळ . आणि अनेक सह्यसुळके . पाठमोरे होताच अगदी स्पष्ट पणे नजरेस पडतो तो ; स्वराज्याचा विस्तार आणि स्वराज्यरोहनचा दिमाखदार सोहळा  ज्याने उघड्या नेत्रांनी अनुभवला तो स्वराज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड . स्पष्ट पणे दिसणारी राजसदर आणि जगदीश्वराचे मंदिर सूर्यकिरणांनी उजळून निघाले होते  . काळ नदीचा वळणावळणाचा पांढरा धोट नागमोडी मार्ग आणि दाटीवाटीने वसलेले पाडे . लिंगोबाच्या  शिखरावरून दिसणारे हे विहगंम दृश्य डोळ्यात साठवून दिमाखात फडफडणाऱ्या भगव्याला छातीशी कवटाळत लिंगोबाच्या शिखरावरची माती कपाळाला लावून उतरण्याचा थरार अनुभवत पायथ्याकडे कूच केली ; ती पुन्हा एक थरारक साह्यसूळका सर करण्याची आस मनी धरूनच .

जय भवानी ! जय शिवाजी !

शिवाजी आंधळे

संपर्क : ९८५०५५५९५२

shivaandhale.75@gmail.com

 

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Apr 25, 2017

No Comments

Leave a Reply