Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

शिखर फाऊंडेशन कडून नागफणी सुळका सर

मुंबई महामार्गावरून प्रवास करत असताना खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळून डाव्याबाजूला समोर काही अंतरावर एक अजस्त्र साह्य सुळका काळजाचा ठेका चुकवत, लक्ष वेधून घेतो तोच नागफणी अर्थात ड्युक्सनोझ सर करून “शिखरफाऊंडेशन” च्या गिर्यारोहकांनी नववर्षाची सुरुवात दिमाखात केली.

शनिवारच्या काळोख्या रात्रीच मोहीम प्रमुख विक्रांत शिंदे यांच्या नेत्रत्वा खाली “शिखर” चे सतरा गिर्यारोहक चिंचवड येथून लोणावळ्याच्या दिशेने रवाना झाले. रात्रीचे दहा वाजले असताना सुद्धा पर्यटकांच्या वर्दळीने गजबलेल्या रस्त्याने मार्ग काढत टीम सरळ कुरवंडे गावात पोहचली. नेहमीप्रमाणे सुरक्षित जागा शोधून गाड्या पार्क केल्या. रात्रीचे १०:४५ वाजले होते. आजूबाजूला सामसूम जाणवत होती. तसे ड्युक्सनोझ सर्वांच्या परिचयाचा असल्यामुळे फार चौकशी करण्याची गरज भासली नाही. आवश्यक सामानाची विभागणी करून बॅगा पाठीवर टाकत टीमने ड्युक्सच्या दिशेने प्रस्थान ठेवले. आठवड्याभरापूर्वीच पोर्णिमा होऊन गेल्यामुळे शितल चांदण्यात न्हाऊन निघण्याचा योग नशिबी नसल्यामुळे किर्रर्र अंधारातच टीम शिखर चढनीला लागली. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर सर्वजण एका ठिकाणी थांबले. रहदारीपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे, याठिकाणी पर्यटकांच्या बरोबरीने भटक्यांची गर्दीही खूप प्रमाणात असते.
त्यामुळे येथे अनेक पायवाटा तयार झालेल्या आहेत; त्यामुळेच येथे अंधाऱ्यारात्री वाटचुकण्याचे प्रमाण जास्त आहे; पण योग्यवाटेचा शोधघेत आम्ही साधारणतः११:३०च्या दरम्यान ड्युक्सच्या खालच्या बाजूला असलेल्या पठारावर पोहचलो.

पुणे - मुंबईमहामार्गावरून अविरतपणे सुरु असलेल्या रहदारीमुळे ड्युक्स- डचेस्च्या बरोबरीने आसपासच्या डोंगररांगा आणि संपूर्ण व्हॅली गाडयांच्या प्रकाशझोतांनी उजळून निघाली होती. प्रकाशझोत अंगावरपडूनही ड्युक्सची भेदकता काळजाचा थरकाप उडवणारी भासत होती. पठारावरून दिसणाऱ्या ड्युक्सचे अंधाऱ्यारात्रीचे भेदक रूप कॅमेऱ्यात कैद करत आणि कोकणभूमीवर उतरलेल्या कृत्रिम आकाशगंगेचे विलोभनीय रूप डोळ्यात साठवून टीम उद्याच्या मोहिम फत्तेच्या विचारणे निद्राधीन झाली .

रविवार दिनांक २२ जानेवारी २०१७ पक्षांच्या किलबिलाटाने भल्या पहाटेच जाग आली ; तेव्हा समोर धुक्यातून डोकावणारे सह्याद्रीतले असंख्य सुळके मन मोहित करत होते. सर्वदूर धुके पसरले होते . महामार्गावरील सततच्या राहदारीमुळे आणि गोंगाटामुळे रात्र संपून दिवस कधी उजडला ते कळालेच नाही . चूळ भरून  थोडी पेटपूजा उरकून घेत सर्वांच्या माना पुन्हा एकदा ड्युक्सकडे वळल्या . क्लाईंम्बिंग इक्विपमेंटची बॅग उचलून सर्वजण ड्युक्सच्या पायथ्याला पोहचले. कोकणकडावीर आणि शिखरचे अध्यक्ष विवेकानंद तापकीर यांनी सुरक्षितते सह क्लाईंम्बिंगबद्दल सूचना देऊन संजय भाटे यांच्यावर प्रथम चढाईची धुरा सोपवली . डचेस्पासून ड्युक्सकडे जाणारी जीवघेणी ट्रायव्हर्स पार करून चढाईवीर क्लाईंम्बिंगरूटच्या पायथ्याला पोहचले. संजय इक्विपमेंट अंगावर चढवून सज्ज झाला होता; आणि त्याच्या सुरक्षादोराची जवाबदारी विक्रांत शिंदे सांभाळणार होता .

सकाळी ९ : २५ मिनिटांनी गणपती बप्पा मोरया ! जयभवानी ! जयशिवाजी ! जयघोषात संजय ड्युक्सला भिडला . प्रचंड अनुभवी विक्रांत शिंदेच्या हाती सुरक्षादोर आणि अनेक साह्यसूळक्यावरती लिलया चढाई करणारे प्रविण पवार, विवेक तापकीर सारखे क्लाईंम्बर पाठीमागून मार्गदर्शन करत असताना खचेल आणि झुकेल तो संजय कसला ! आणि पाहता - पाहता संजयने कुठेही न अडखळत पहिल्या १०० फुटाची चढाई पहिल्या दोन तासात पूर्ण केली . त्यानंतर त्याच्या पाठीमागे विक्रांत शिंदे यांनी पण झुमरिंग न करता फ्रीक्लाईंम्ब करत पहिला टप्पा पार केला. त्यांचा सुरक्षा दोर जालिंदर वाघोले यांनी सांभाळला.
दुसऱ्या टप्यासाठी पुन्हा एकदा संजय तयार झाला होता . बाजूला असलेल्या मधमाशांच्या पोळ्यापासून कुठलाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेत अगदी सावधपणे संजयने दुसऱ्या टप्याकडे कूच केली . दुसऱ्या टप्यावर सुद्धा संजय अगदी लिलया पोहचला. त्यानंतर विक्रांत सुद्धा . तो पर्यंत जालिंदर वाघोले पहिल्या टप्यावत येऊन पोहोचला होता . उन्हाचा पारा वाढला तशी वरच्या बाजूला व्हॅलीक्रॉसिंगसाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती . त्यामुळेच कि काय ? पण मधमाशांची गुण-गुण वाढू लागली ; आणि संजयच्या काळजाचा ठेका चुकला . पण मधमाशांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेत , संजय तिसऱ्या टप्याकडे कूच करण्यास सज्ज होत होता . तो पर्यंत जालिंदर दुसऱ्या टप्यावर येऊन पोहोचला होता . आणि विक्रांतला थोडा वेळ विश्रांती देत जालिंदरने सुरक्षा दोर सांभाळण्याचे ठरवले . ड्युक्सनोझ वर बऱ्याच वेळा मधमाशांच्या भिती पोटी अनेक प्रस्तरारोहकांवर मोहीम अर्धवट सोडून जाण्याची वेळ आलेली आहे . त्यामुळे संजयच्या मनामध्ये थोडी भीतीहि होतीच. पण जिगरबाज संजय लढत होता . दुसऱ्या टप्यापेक्षा तुलनेने अवघड असणारा तिसरा टप्पा सुद्धा, भैरवगडा सारख्या मोहिमेचा अनुभव पाठीशी असलेल्या संजयने युक्तीच्या जोरावर पार केला. पाठीमागून विक्रांतहि वर पोहचला. वेळेचे आणि अंतराचे गणित जुळत नव्हते, त्यामुळे विवेक आणि प्रविण विक्रांतशी संपर्क साधून सूचना करत होते . इकडे संजय सुद्धा थकलेला असून जिद्द सोडत नव्हता. तसा सूर्यसुद्धा मावळतीकडे झुकतच होता . घाई करणे गरजेचे आहे हे ओळखून नव्या दमाचा विक्रांत पुढे आला; आणि चौथ्या टप्याकडे झेपावला. दिवसभराच्या प्रवासातला सर्वात अवघड टप्पा. ओव्हर हँग मुळे चढाई करण्यामध्ये प्रचंड त्रास होत होता, अनुभवाचा कस लागत होता ; पण मागे सरकेलतो विक्रांत कसला. अर्ध्या तासाच्या झटापटीनंतर विक्रांत चाल करत चौथ्या टप्यावर स्वार झाला. अन मोहीम एका निर्णायक टप्यावर पोहचली. विक्रांतच्या पाठोपाठ संजय पुढे झेपावला ; पण झुमरिंग करताना सुद्धा कस लागत होता. यावरून चौथ्या टप्याची भीषणता लक्षात येते . शेवटी संजय भाटे चौथ्या टप्यावर स्वार झाला आणि त्या पाठोपाठ जालिंदर सुद्धा.

वेळ खूप कमी होता. सावल्या पूर्वेकडे पूर्णपणे झुकल्या होत्या. पश्चिमेला लाली पसरली होती . तसा इकडे मोहीम फत्तेच्या दिशेने विक्रांतचा वारू दौडत होता . विजय टप्यात आला होता . विजय साजरा करण्यासाठी विवेक आणि शिवाजी पाठीमागच्या रस्त्याने ड्युक्सवर पोहचले होते . विक्रांत विजयी मुद्रेने चढाई करत होता आणि फार दिवसापासून पाहिलेले स्वप्नसाकार होत होते . शेवटी संध्याकाळी ६:०० वाजता विक्रांतने जोशपूर्ण चढाई करुन जय भवानी ! जय शिवाजी ! शिवगर्जनेचा एकच नाद करत नागफणी अर्थात ड्युक्सनोझच्या शिखरावर पाऊल ठेवले. विवेक तापकीर यांनी भावपूर्ण आलिंगन देत विक्रांतचे अभिनंदन केले. त्यानंतर काही वेळातच शेवटच्या टप्यावर सुरक्षा दोर सांभाळणार जालिंदर हि माथ्यावर पोहचला . अंधार दाटू लागला होता . दोराला लटकलेले अजून तीन शिखरवीरवर येणे बाकी होते . विवेक आणि विक्रांत डचेस्सुळक्यावरून मार्गदर्शन करत होते . संजय पुढे सरकत होता तसे त्याच्या पाठीमागे नितीन टाव्हरे आणि प्रविण पवार वाईंडप करत वर येत होते . ६:४५ ला संजय वर पोहचला ; तसे १५ - १५ मिनिटांच्या अंतराने नितीन आणि प्रविण पण ड्युक्सच्या सुळक्यावर पोहचले आणि पुन्हा एकदा शिवगर्जनेचा नाद करत अखंड सह्याद्री दणाणून सोडला ; आणि पुन्हा एकदा एकमेकास आलिंगन देत आनंद साजरा केला . हा उत्साह आणि आनंद पाहून ; दिवसभर उघड्या नेत्रांनी हा थरार अनुभवनाऱ्या सूर्यदेवालाहि वाटले असेल , आपण जरा मावळण्याची घाईच केली , अजून थोडा वेळ थांबलो असतो तर ; आनंदसोहळ्यात सामील तरी होता आले असते ! आनंदाला उधाण आले होते, पणवेळेचे भान ठेवून , अंधाऱ्या रात्रीतच भगवा डौलाने फडकवत सर्वजण कुरवंडेगावच्या दिशेने उतरणीला लागले .

यामोहिमेमध्ये शिखरचे अध्यक्ष विवेक तापकीर , प्रवीण पवार , विक्रांत शिंदे , संजय भाटे , जालिंदर वाघोले , नितीन टाव्हरे , शिवाजी आंधळे , सुधीर गायकवाड , भास्कर मोरे , अजिंक्य उनवने , मयूर देशपांडे , दिनेश महाले , प्रतीक मोरे , स्वप्नील आंधळे , रवि खोत , सुरज वारंग आणि तिमिर पवार असे सतरा गिर्यारोहक सामील झाले होते .

शिवाजी आंधळे
भ्रमणध्वनी : ९८५०५५५९५२
Shivaandhale.75@gmail.com

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Mar 11, 2017

No Comments

Leave a Reply