Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

के टू एस

काल रात्री चांदण्याच्या शितल प्रकाशात आणि भरउन्हाळ्यात हि हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत शिखर फाऊंडेशन च्या माध्यमातून आणि काही नवख्या तर काही कसलेल्या ५३ ट्रेकर्स च्या बरोबरीने कात्रज ते सिंहगड ट्रेक पूर्ण केला अर्थात के टू एस .

८:४५ मि. सुरु झालेला ट्रेक दमछाक करणाऱ्या  चढाईने तर पायाचा थरकाप उडवण्याऱ्या तीव्र उताराने,  तर मध्येच डोळ्याना भोवळ आणणाऱ्या डोंगरदऱ्या च्या कडेने अंग चोरत , तर कधी बसत तर कधी उठत , तर कधी साथीदारांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न करत , उत्तरेकडे उतरलेल्या आकाशगंगेचा आनंद लुटत ( शहरातील लाईटस ) रात्री दीड वाजता ट्रेक पूर्ण केला .

चिंचवड येथून सहा वाजताच कात्रज च्या दिशेने प्रस्थान ठेवले . ट्रेक म्हटले की ; काहीं जोमात तर काही कोमात ! . नवख्या ट्रेकर्स च्या मनातील भीती चेहऱ्यावर जाणवल्या शिवाय राहत नाही . तर कसलेल्या ट्रेकर्स च्या मनात एकच ध्यास असतो ; कधी एकदाचा भिडतो ,  आणि मागच्या वेळेचा  रेकॉर्ड कधी एकदाचा मोडतो . पण काही मात्र निश्चल असतात . अशाच रीतीने काही जोमात तर काही कोमात असणाऱ्या मित्रांना एकत्र करत , बेंगलोर हायवेवरची वाहतूक कोंडी पार करत कात्रजचा जुना बोगदा गाठला . आज पौर्णिमा जरी नसली तरी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे शु.१४ आणि शनिवारचा दिवस अर्थात उद्या सुट्टी . म्हणजे “ सोने पे सुहाग ” आणि या संधीचा फायदा उठवत माझ्या सारखे बरेचशे ट्रेकर्स या ठिकाणी जमा झालेले दिसत होते . डोंगराची डावी सोंड पकडून सरळ तळजाईचे मंदिर गाठले . नेहमी प्रमाणे नवख्या ट्रेकर्सना काही महत्वाच्या सूचना देऊन पश्चिमेकडच्या डोंगर शिखराकडे झेपावलो . पुढच्या काही मिनिटातच पुढच्या तीन टेकड्या पार करून संपूर्ण ट्रेक मधला अवघड समजला जाणारा रॉक पॅच आणि ट्रेकर्स च्या घासरगुंडीने निसरड्या झालेल्या तीव्र उताराजवळ पोहचलो . एकमेकांना साथ करत एकदाचा तो पॅच पूर्ण करून सिंहगडाच्या दिशेने झेपावलो . अनेक टेकड्या अनेक उतार पार करत तर कधी उत्तरेकडच्या नभांगणाचा आनंद लुटत सीतेचा दरा गाठला . पुढच्या मागच्या टीमचा मेळ घालत सर्वांनी दमलेल्या पायांना विश्रांती देत पेटपूजा उरकून घेतली . थोड्यावेळाच्या विश्रांती नंतर अंगावर दिसणारा डोंगर पार करत शेवटच्या टप्यातील चढाईकडे कूच केली . गार वारा अंगाला झोंबत होता . जेवण झाल्यामुळे जास्तच थंडी भासत होती . अत्ता थंडीला पळवून लावण्यासाठी एकच पर्याय होता तो म्हणजे न थांबता न थकता जोरदार चढाई करणे . शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील तीन टेकड्या घामाच्या धारात  पार करत सिंहगडावरील टी व्ही टॉवरच्या लाईट डोळ्यासमोर ठेवत कोंढणपूर फाटा गाठला . आन् पुन्हा या वर्षातील एक शरीराची कसोटी पाहणार ट्रेक पूर्ण केल्याचा आनंदातून चेहऱ्यावरील घामाच्या धारा पुसत तांबडं फुटायच्या आत पुण्याचा रस्ता धरला .

––– शिवाजी आंधळे

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Mar 14, 2017

No Comments

Leave a Reply